महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

राजापूर- संदीप शेमणकर
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चा निकाल पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आला होता.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हास्तरावरील स्पर्धेत रत्नागिरी शहरातील मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला. राजापूर तालुक्यातील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तृतीय क्रमांक मिळवत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हास्तरावरील विजेत्या मंडळांना शासनाकडून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये तसेच प्रशस्तीपत्र देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत बक्षीसाची रक्कम संबंधित मंडळांच्या खात्यात जमा करण्यात आली असून प्रमाणपत्रेही मंडळांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळालेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकजागृतीपर उपक्रमांना मिळालेली ही शासनमान्यता असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.















