शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे ‘फुलांचा मळा’ साकारतोय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे ‘फुलांचा मळा’ साकारतोय

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची यशस्वी फुलशेती

आबलोली (संदेश कदम) – चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून विविध फुलांची लागवड केली आहे. अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत झेंडू, अस्टर आणि गुलछडी फुलशेतीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कोकणातील पोषक हवामान आणि योग्य नियोजनाच्या मदतीने फुलशेतीत भरघोस उत्पादन घेत आर्थिक लाभ मिळवता येतो, हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.

विद्यार्थ्यांनी १० गुंठे क्षेत्रावर ड्रीम यलो आणि कलकत्ता जंबो जातींच्या झेंडूची, ३ गुंठे क्षेत्रावर अस्टरची आणि २ गुंठे क्षेत्रावर गुलछडीची लागवड केली आहे. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी १९:१९:१९ (रोपे वाढीसाठी), ह्युमिक ॲसिड (मुळांच्या वाढीसाठी), १३:४०:१३ (कळ्यांच्या वाढीसाठी) आणि १३:००:४५ (फुलांचे वजन वाढवण्यासाठी) अशी संतुलित खत व्यवस्थापन पद्धती अवलंबली आहे.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७०० किलो झेंडू, ७० किलो अस्टर आणि ३० किलो गुलछडीचे उत्पादन झाले आहे. विशेषतः शिमगोत्सवासाठी पंचक्रोशीतील गावांतून या विद्यार्थ्यांच्या फुलांना मोठी मागणी आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी तयार केलेले फुलांचे हार आणि गुच्छ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून, दोन महिन्यांत ३९० हारांची विक्री झाली आहे. सावर्डे आठवडी बाजारातही या फुलांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या प्रकल्पाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील, उद्यानविद्या विभाग प्रमुख प्रा. स्मिता जाधव आणि प्रकल्प अधिकारी प्रा. अंकीता पाटील यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले आहे.

विद्यार्थ्यांनी राबवलेला हा प्रयोग कोकणातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि भविष्यात फुलशेतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]