पडवे जिल्हा परिषद गटातून काँग्रेस स्वबळावर लढणार; ‘स्वबळाचा नारा’ देत तयारीला वेग

rv ad

पडवे जिल्हा परिषद गटातून काँग्रेस स्वबळावर लढणार; ‘स्वबळाचा नारा’ देत तयारीला वेग

गुहागर | प्रतिनिधी – सुजित सुर्वे, पडवे 

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पडवे जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेत ‘स्वबळाचा नारा’ दिला आहे. यासोबतच पडवे पंचायत समिती गण तसेच पाचेरी-आगर पंचायत समिती गण या ठिकाणीही काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गटात काँग्रेसची सामाजिक बांधिलकी मजबूत असल्याचे चित्र असून, पडवे मुस्लिम मोहल्ला आणि कुडली येथील कोळी समाजामध्ये काँग्रेसची पारंपरिक व ठोस ताकद आहे. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसला नेहमीच मोठे मतदान लाभले असून, स्थानिक कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत असल्याने स्वबळावर विजयाचा आत्मविश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही निवडणुकांत आघाडी-युतीच्या माध्यमातून लढत देणाऱ्या काँग्रेसने यावेळी स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट झाल्याचा दावा करत स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ‘स्वबळावर सत्तेपर्यंत’ हा नारा जोर धरू लागला आहे.

दरम्यान, पडवे जिल्हा परिषद गट, पडवे पंचायत समिती गण आणि पाचेरी-आगर पंचायत समिती गण या तिन्ही ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. अनेक इच्छुकांनी आपले अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सादर केले असून, वरिष्ठ पातळीवर त्यांची छाननी सुरू आहे. पक्ष निरीक्षक, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या २ ते ३ दिवसांत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, प्रतिस्पर्धी पक्षांमध्येही हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असून, स्थानिक विकासकामे, सामाजिक समतोल आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर निवडणूक रंगण्याची शक्यता आहे.

एकूणच, पडवे गटात काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय, तसेच मुस्लिम व कोळी समाजातील मजबूत पाठिंबा, हे निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें