गुहागरमध्ये शिवसेना-भाजप युतीचे शक्तिप्रदर्शन; १५ पैकी १२ जागांसाठी अर्ज दाखल, ३ जागांवर संभ्रम कायम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागरमध्ये शिवसेना-भाजप युतीचे शक्तिप्रदर्शन; १५ पैकी १२ जागांसाठी अर्ज दाखल, ३ जागांवर संभ्रम कायम

अंजनवेल, पाचेरी सडा पंचायत समिती गण आणि असगोली जि.प. गटातील उमेदवारीवर युतीत एकमत नाही


आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा परिषद व गुहागर पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच गुहागर तालुक्यात शिवसेना-भाजप युतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. गुहागरमधील एकूण 15 जागांपैकी 12 जागांसाठी आज युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

गुहागर तहसील कार्यालयात शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांनी भव्य दिव्य रॅलीसह अर्ज दाखल केले. या वेळी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुहागर पंचायत समितीच्या एकूण 10 जागांपैकी शिवसेना-भाजप युतीकडून 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मात्र उर्वरित दोन पंचायत समिती गण — अंजनवेल व पाचेरी सडा, तसेच असगोली जिल्हा परिषद गट या तीन ठिकाणच्या उमेदवारीबाबत अद्याप युतीमध्ये एकमत झालेले नाही. विशेषतः असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव निवडणूक रिंगणात असल्याने युतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना या तीन जागांवरील उमेदवार कोण असणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून सर्वांचे लक्ष आता शिवसेना-भाजप युतीच्या अंतिम निर्णयाकडे लागून राहिले आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]