प्रसिद्धीपलीकडचा दीपस्तंभ : नाटककार दशरथ राणे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रसिद्धीपलीकडचा दीपस्तंभ : नाटककार दशरथ राणे

आजच्या सोशल मीडियाच्या जाहिरातबाजीच्या युगात झटपट प्रसिद्धी, सत्ता आणि आर्थिक स्थैर्य यांनाच यशाची मोजणी मानली जाते. मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, सिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही त्या झगमगाटाला न भुलता, मिळालेल्या समाधानातच जीवनाची खरी श्रीमंती शोधतात. समाजप्रबोधनाचे व्रत स्वीकारून, नाट्यलेखनाबरोबरच कामगार चळवळ, सहकार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात साठ वर्षांहून अधिक काळ निस्वार्थपणे कार्य करणारे, मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाटककार दशरथ काशिराम राणे हे असेच एक मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. वयाच्या ८० व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना, त्यांच्या जीवनकार्याचा सर्वांगीण वेध घेण्यासाठी साहित्यिक पत्रकार गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा आत्मीय आणि चिंतनशील संवाद आहे.

प्रश्न : आपल्या बालपणापासून आजपर्यंतचा प्रवास कसा घडला ?

दशरथ राणे : माझा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मु. बोरथडे (ता. लांजा) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. ग्रामीण जीवनातील कष्ट, मातीशी असलेले नाते आणि माणसातील दुःख जवळून पाहणे मला बालपणातच शिकवले. या अनुभवांनी माझ्या लेखनाकडे वळण दिले आणि पात्रांच्या संघर्षाचे मूळ तयार झाले. प्राथमिक शिक्षण गावात झाले. उपजीविकेसाठी मुंबई गाठली. दिवसा मिळेल ते काम करत असतानाच सोशल नाईट हायस्कूल या रात्रशाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. रात्रशाळेने मला कष्टाची शिस्त, संयम आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आत्मजाणीव दिली. गरिबीतून शिक्षण घेण्याचा हा संघर्ष माझ्या लेखनामध्ये पात्रांच्या संघर्षाचे मूलाधार बनला. माझ्या वैयक्तिक अनुभवामुळे मी नेहमीच समाजातील गरिबांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते माझ्या नाटकांमध्ये प्रतिबिंबित झाले.

प्रश्न : लेखनाची सुरुवात कशी झाली ?

दशरथ राणे : विद्यार्थीदशेत समाजातील प्रश्न मला अस्वस्थ करत होते. यातून वृत्तपत्रांत पत्रलेखन सुरू केले. ही पत्रे दैनिकांत प्रसिद्ध झाली आणि संबंधित खात्यांनी दखल घेत नागरिकांच्या समस्या सोडवल्या. या अनुभवातून मला ठाम जाणीव झाली की लेखन हे सामाजिक बदलाचे प्रभावी साधन ठरू शकते. ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर माझा सत्कार झाला. तिथेच मला जाणवले की नाटककार म्हणून माझा सामाजिक दृष्टिकोन फक्त रंगभूमीतच नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही परिणामकारक ठरतो. या काळात मला लेखनासाठी मान्यता मिळाल्यामुळे माझ्या सामाजिक दृष्टिकोनाची खरी ताकद लक्षात आली, आणि मी नाट्य आणि लेखन या माध्यमातून समाजप्रबोधनावर अधिक लक्ष केंद्रित केले.

प्रश्न : नोकरी, चळवळ आणि लेखन यांचा समन्वय कसा साधला ?

दशरथ राणे : १ फेब्रुवारी १९६६ साली पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून रुजू झालो. पुढे खात्याअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन १ मार्च २००७ सहाय्यक पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झालो. पोस्टकामगारांच्या एन.एफ.पी.ई. संघटनेत सुरुवातीपासून सक्रिय राहिलो. २००७ साली सेवानिवृत्त होताना मी मुंबई दक्षिण विभागाचा अध्यक्ष होतो. कामगार चळवळीतील संघर्ष, अन्याय आणि एकजूट या गोष्टी माझ्या नाटकांच्या केंद्रस्थानी कायम राहिल्या. नोकरी ही उपजीविकेचे साधन होती, तर चळवळ आणि लेखन ही माझ्या आत्म्याची गरज होती, या तिन्हींचा समतोल राखण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला. पोस्टच्या कामामुळे मी विविध स्तरांवरील कामगारांचे जीवन अनुभवले, ज्यामुळे नाटकांमध्ये वास्तववादी पात्र निर्माण होऊ शकले.

प्रश्न : नाट्यलेखनाची सुरुवात कशी झाली ?

दशरथ राणे : १९६६ मध्ये ‘घरमालकाचा घरजावई’ ही जागा टंचाईवर आधारित विनोदी एकांकिका लिहिली. विनोदाच्या माध्यमातून गंभीर सामाजिक प्रश्न मांडणे अधिक परिणामकारक ठरते, हे मला तेव्हाच जाणवले. ‘नवाकाळ’ चे उपसंपादक दत्ताराम बारस्कर यांनी शाल-श्रीफळ देऊन प्रोत्साहन दिले; तो क्षण आजही प्रेरणादायी वाटतो. त्या प्रोत्साहनाने माझ्या आत्मविश्वासाला बळ मिळाले आणि रंगभूमीशी माझे नाते अधिक घट्ट झाले.

प्रश्न : नाट्यप्रवासाचा विस्तार कसा झाला ?

दशरथ राणे : ‘उसन्या बायकोची वरात लग्नाची’ या नाटकाने जिल्हास्तरापासून महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेपर्यंत प्रयोगांचा उच्चांक गाठला. अनेक ठिकाणी लेखन पारितोषिकांसह अनेक पारितोषिके मिळविण्याचा विक्रम केला. हौशी रंगभूमी ही समाजाच्या मुळाशी जोडलेली असल्याने मला ती नेहमीच जवळची वाटली. प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारी ही रंगभूमी सामाजिक वास्तवाचे खरे प्रतिबिंब दाखवते आणि समाजप्रबोधनात नाटककाराची भूमिका अधोरेखित करते. वृत्तपत्रलेखन, कथा, कविता लेख, प्रस्तावना असे विविधांगी लेखन करताना नाटक एकांकिका अशा विविध विषयांवर मिळून ७८ पुस्तके प्रकाशित केली. त्यापैकी काही नाटकांच्या १२ आवृत्याही हातोहात विकल्या गेल्या. १९७२ साली बडोद्याच्या ‘त्रिमूर्ती’ संस्थेने ‘मुधचंद्राने केला घोटाळा’ हे नाटक दिल्लीच्या महाराष्ट्र रंगायतानच्या नाट्य महोत्सवात सादर करुन पारितोषिक प्राप्त केले. याच नाटकाचे गुजराती भाषेतले प्रयोग विशेषत्वाने हाऊसफुल्ल ठरले. ह्या दरम्यान १९९९ मध्ये प्रमोद नवलकर यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘उषा लोटलीकर स्मृती पुरस्कार’ प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळाला म्हणून पोस्टातर्फे श्री. डी. एस. भालचंद्रन, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल यांच्या हस्ते कौतुक सोहळा संपन्न झाला. निवृत्तीच्या वर्षी अर्थात २००७ मध्ये मा. आर. आर. पाटील यांच्या हस्ते त्रिदल प्रकाशनचे ‘बापूसाहेब टिळक स्मृती पुरस्कार’ प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळाला म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातून शाहीर साबळे व स्मिता तळवलकर यांच्या हस्ते कौतुक सोहळा संपन्न झाला. तर नाट्यलेखन कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार केला.

प्रश्न : बहुभाषिक प्रयोगांचा अनुभव कसा होता ?

दशरथ राणे : माझ्या नाटकांचे मराठीबरोबर हिंदी, गुजराती आणि कन्नड भाषांत प्रयोग झाले. भाषा बदलली तरी माणसाच्या भावना आणि सामाजिक प्रश्न सारखेच असतात, हे या प्रवासात प्रकर्षाने जाणवले. या अनुभवामुळे साहित्याची सार्वत्रिकता आणि मानवी संवेदनांची एकसूत्रता अधिक ठळकपणे समोर आली.

प्रश्न : आजच्या नव्या पिढीबद्दल आपले निरीक्षण काय ?

दशरथ राणे : नव्या पिढीत ऊर्जा आणि बुद्धिमत्ता आहे; मात्र संयम आणि सातत्य कमी होत चालले आहे. सल्लागार म्हणून काम करताना हे वारंवार जाणवते. जर ही पिढी मूल्यनिष्ठा, चिकाटी आणि सांस्कृतिक संवेदनशीलता जपेल, तर भविष्यातील नेतृत्व त्यांच्या हाती सुरक्षित राहील. नव्या पिढीला मार्गदर्शन देणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे.

प्रश्न : आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना काय वाटते ?

दशरथ राणे : न मिळालेल्या गोष्टींची खंत नाही. मिळालेल्या अनुभवांनी मला समृद्ध केले आहे. आजही लेखन सुरू आहे आणि नवोदितांना मार्गदर्शन करता येते, याहून मोठे समाधान नाही. आयुष्याची संध्याकाळही सर्जनशीलतेने उजळू शकते आणि नवोदितांसाठी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणे हे माझे कर्तव्य आहे.

साठ वर्षांहून अधिक काळ नाट्यलेखन, कामगार चळवळ, सहकार तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहूनही प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेला हा रंगकर्मी आजही तितक्याच शांततेने आपले कर्तव्य बजावत आहे. ८० व्या वर्षाकडे वाटचाल करत असतानाही लेखनाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे दशरथ राणे हे केवळ नाटककार नस%8

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]