पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा शासकीय रुग्णालयाची कामगिरी उंचावली; दिव्यांग प्रमाणपत्र व संभाजी महाराज स्मारकावरही आढावा


रत्नागिरी, दि. 16 (जिमाका):
जिल्हा शासकीय रुग्णालयाची मागील दोन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाली असून विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत आहेत, असे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रांतून (पीएचसी) जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेला स्पष्ट सूचना देताना, अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यास सांगितले. तसेच 2 कार्डीयाक आणि 12 सर्वसाधारण अशा एकूण 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.

सध्या जिल्हा रुग्णालयात 145 डॉक्टर कार्यरत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आरोग्य सेवेला बळ मिळाले आहे. गुढघारोपणासारख्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री म्हणाले की, गरीब व गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचार मिळाले पाहिजेत. कोणत्याही कारणास्तव रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच रुग्णालयातील सुविधा व सेवांवर समिती सदस्यांनी नियमित देखरेख ठेवावी आणि महिन्यातून एकदा बैठक घ्यावी.


दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी
ऑडिओलॉजी तपासणीअभावी थांबलेल्या दिव्यांगांच्या पेन्शनबाबत त्यांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथून तज्ज्ञांना बोलावून शिबिरे आयोजित करावीत आणि पात्र लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांची पेन्शन सुरू करावी, असे सांगितले. तसेच दिव्यांगत्वाच्या टक्केवारीतील बदलांची चौकशी करून फेरतपासणी करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


संभाजी महाराज स्मारकाचा आढावा
कसबा संगमेश्वर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. या प्रकल्पात प्रवेशद्वार, रस्ते मजबुतीकरण व सुशोभिकरण, ग्रंथालय, संग्रहालय, घाट विकास तसेच परिसरातील मंदिरांचे जतन यांचा समावेश आहे.

उपलब्ध 5 कोटी रुपयांच्या निधीतून स्मारक परिसर सुशोभिकरण, पुतळा परिसर, उपहारगृह व प्रसाधनगृह यांसारख्या सुविधा तातडीने उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]