१३ लाखांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम ठेकेदार निर्दोष; गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय , ॲड. संकेत साळवी यांच्या बिनतोड युक्तिवादाला मान्यता; पुराव्याअभावी न्यायालयाकडून दिलासा

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

▫️13 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता
▫️गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
▫️ॲड. संकेत साळवी यांचा बिनतोड युक्तिवाद मान्य

आबलोली (संदेश कदम)
13 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता झाली असून हा निर्णय गुहागर न्यायालयाने नुकताच जाहीर केला. या कामी गुहागरचे सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी यांचा बिनतोड युक्तिवाद मान्य झाला असून 13 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील कुटगिरी या गावांमध्ये राहत असलेल्या आंबोकर कुटुंबीयांना सन 2014 मध्ये त्यांचे जुने घर दुरुस्त करून त्या ठिकाणी नवीन घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी पेवे येथील बांधकाम ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांना घर बांधण्याचे कंत्राट दिले. घर बांधकामाची एकूण किंमत 8 लाख इतकी ठरवण्यात आली त्यानंतर घराचे जुने वापरते सामान याची किंमत 4 लाख 65 हजार इतकी ठरवण्यात आली. एकूण १३ लाख इतक्या किमतीमध्ये घर बांधून देण्याचे बांधकाम ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांनी कबूल केले होते व तसा करारही दोघांच्या मध्ये करण्यात आला होता.
सन 2014 ते सन 2019 या काळामध्ये कंत्राटदाराने घराचे बांधकाम न करता ते अपूर्ण अवस्थेत ठेवले. पाच वर्षाच्या काळात सुद्धा वारंवार पाठपुरावा करून देखील घर बांधून पूर्ण झाले नाही. या काळात त्या घरातील दोन वयोवृद्ध माणसे दुसऱ्यांच्या घरामध्ये मयत झाली. या गोष्टीमुळे हतबल होऊन आंबोकर कुटुंबीयांनी सन 2019 मध्ये गुहागर पोलीस स्टेशन येथे आरोपी ठेकेदाराविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुहागर पोलिसांनी त्यांच्या तपास कामांमध्ये, घराच्या जागेचा पंचनामा, साक्षीदारांचे जाबजबाब आणि आर्थिक व्यवहार संबंधी बँक खात्याचे स्टेटमेंट या सर्व पुराव्यानिशी आरोपी कंत्राटदार याचे विरुद्ध गुहागर न्यायालयामध्ये सविस्तर दोषारोप पत्र दाखल केले होते. या केसच्या सुनावणी दरम्यान आरोपी कंत्राटदार मुश्ताक खान याचे वतीने *सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी* यांनी कामकाज पाहिले. बांधकाम व्यावसायिका विरुद्ध गुन्हा असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकांचे या खटल्याच्या सुनावणी कडे लक्ष लागून राहिले होते. सरकारी पक्षाच्या सर्व साक्षीदारांचा उलट तपास ॲड. संकेत साळवी यांनी केला. या खटल्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना, आरोपी याचे विरुद्ध गुन्हा साबित झालेला असून आंबोकर कुटुंबीयांनी आरोपी यांना दिलेले पैसे व त्याबाबतचा आर्थिक व्यवहार कोर्टासमोर योग्य पद्धतीने मांडण्यात आला आहे तसेच आरोपी आणि आंबोकर कुटुंब यांच्या दरम्यान झालेला करार देखील कायदेशीर रित्या शाबीत झालेला आहे त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध झालेले असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
आरोपी कंत्राटदार यांच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी युक्तिवाद करताना सरकारी वकिलांचे सर्व मुद्दे खोडून काढले. मुळातच आरोपी कंत्राटदार आणि आंबोकर कुटुंबीय यांच्यामध्ये झालेल्या कराराचा जर भंग झाला असेल तर त्यांनी सक्षम दिवाणी न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागितली पाहिजे असा युक्तिवाद ॲड. संकेत साळवी साळवी यांनी केला. त्याचप्रमाणे कराराची तारीख आणि घराचे बांधकाम सुरू केल्याची तारीख यामध्ये तफावत असून करार हा बांधकाम सुरू झाल्यानंतर तीन ते चार महिन्याच्या अंतराने करण्यात आलेला आहे ही बाब आरोपीचे वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली. तसेच आंबोकर कुटुंबीयांनी आरोपी कंत्राटदार यांना जितके पैसे दिले तितक्या पैशांचे त्यांनी बांधकाम पूर्ण केलेले असून अचानक फिर्यादी कुटुंबीयांनी वाढीव बांधकाम करण्यास सांगितल्याने आरोपी यांनी काम थांबवले. पोलिसांनी त्यांचे संपूर्ण तपास कामांमध्ये आत्तापर्यंत झालेल्या बांधकामाचे शासकीय मूल्यांकन रेकॉर्डवर आणलेले नाही. त्यामुळे आरोपीचे विरुद्ध केवळ पैसे घेतले म्हणून गुन्हा शाबीत होऊ शकत नाही असा बिनतोड युक्तिवाद ॲड. संकेत साळवी यांनी केला. केसच्या तपास कामातील कागदपत्रे आणि ॲड.संकेत साळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून गुहागर न्यायालयाने काल आरोपी मुश्ताक खान सरगुरो याची फसवणुकीचे गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याच्या कामकाजामध्ये ॲड.संकेत साळवी यांना त्यांचे सहकारी ॲड. अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड. मानसी सोमण आणि ॲड. रोशनी पवार यांनी सहकार्य केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]