रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, अवैध मद्यविक्रीवर संयुक्त कारवाईची मागणी

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक तसेच सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जयस्तंभ येथे लाक्षणिक उपोषण करत गोवा बनावटीच्या अवैध दारू तस्करीविरोधात जोरदार आंदोलन केले.

परवानाधारकांनी सांगितले की, गेली ५४ वर्षे कायदेशीर व्यवसाय करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देण्यात आला. मात्र मागील काही वर्षांत गोवा बनावटीच्या बोगस दारू तस्करीमुळे शासकीय महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. याशिवाय परवाना शुल्कात मोठी वाढ झाल्याने अधिकृत व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

आंदोलकांनी शासनासमोर असा मुद्दा मांडला की, जसे रोड टॅक्स धोरण बदलल्यानंतर महाराष्ट्राचा महसूल वाढला, त्याचप्रमाणे अबकारी करात सुधारणा केल्यास राज्याचा उत्पादन शुल्क आणि व्हॅट महसूल मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सध्या सुमारे ४० हजार कोटींचा महसूल दीड लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला.

तसेच महाराष्ट्रात २१० रुपयांना मिळणारी व्हिस्कीची क्वार्टर गोव्यात फक्त ३० रुपयांत उपलब्ध असल्याने सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर दारू आणली जात असल्याचा आरोप करण्यात आला. काही शाळकरी विद्यार्थीही खाऊचे पैसे जमा करून ही दारू विकत घेत असल्याने सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

प्रशासनाकडे मांडल्या प्रमुख मागण्या

परवानाधारकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :

  • अवैध गोवा दारू विक्रीवर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस पाटील, महिला बचत गट आणि होमगार्ड यांच्या संयुक्त पथकातून कारवाई करावी.
  • ज्या ठिकाणी दारूचा साठा सापडेल त्या जागामालकावर गुन्हा दाखल करावा.
  • संबंधित अधिकाऱ्यांच्या हद्दीत अवैध विक्री आढळल्यास त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे.
  • बेकायदेशीर विक्रेत्यांच्या मालमत्तेची चौकशी करून संपत्ती जप्त करावी.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी.

लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गोवा अवैध दारूविरोधात कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

या उपोषणात जयेंद्र कोठारकर, अनिश भाटकर, संतोष जंगम, स्वप्नील आंबोलकर, राजीव कीर, सुहास भोसले, विजय कदम, समीर तिवरेकर, सुदीप चव्हाण, सचिन वाघधरे, प्रशांत पवार, विनय गुरव, सचिन आखाडे, सतीश घाडी, सनी करंगुटकर, रविंद्र गुरव, संजय ओगले, संजय काणेकर यांच्यासह अनेक परवानाधारक सहभागी झाले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]