कुणबी विकास मंडळ असोरेचा हरित संकल्प; उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत १०० वृक्षांचे वृक्षारोपण

‘आपलं गाव… आपला अभिमान…’ या ब्रीदवाक्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मुंबईतील ३२ युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गुहागर : गुहागर तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे (रजि.) यांच्या वतीने असोरे गावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. “आपलं गाव… आपला अभिमान… विकासासाठी सर्वांचे योगदान” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जांभूळ, चिंच आणि बकुळ या प्रजातींच्या १०० वृक्षांची लागवड गावातील विविध ठिकाणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे उपसभापती तथा तरुण नेतृत्व निलेश सुर्वे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत असोरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ग्रामस्थांसोबत कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील कुणबी विकास मंडळ असोरेचे ३२ युवा कार्यकर्ते विशेषतः वृक्षारोपणासाठी गावात दाखल झाले होते. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांप्रमाणेच गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी युवक सातत्याने गावात येऊन वृक्षारोपण करत असल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
कुणबी वाडी विकास मंडळ असोरे ज्ञाती सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला विनायक सुर्वे, मंडळाचे अध्यक्ष दिनेश डिंगणकर, कृष्णा बादावटे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी महिंद्र निमकर, संतोष आग्रे, राजेंद्र गोंधळी, रामचंद्र गोंधळी, गोविंद गोंधळी, वसंत बादावटे, बबन बादावटे, सखाराम गोंधळी, विनय गोंधळी, महादेव गोंधळी, शांताराम गोंधळी, बौद्धजन सेवा संघ असोरेचे अध्यक्ष सुनील सुर्वे, सचिव सुभाष सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे असोरे गावात पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक ऐक्य आणि ग्रामविकासाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.












