खरे खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप; प्रभावी तपासाबद्दल पोलीस निरीक्षक सचिन सावंत व हेडकॉन्स्टेबल आशिष शिंदे यांचा सन्मान
विश्वास खरे खून प्रकरणात ठोस पुराव्यांमुळे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते गौरव
प्रतिनिधी (मंगेश जाधव) | गुहागर
गुहागर तालुक्यातील गाजलेल्या विश्वास खरे खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर, या गुन्ह्याचा प्रभावी तपास करून दोषारोप सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष शिंदे यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
गुन्हा रजिस्टर क्रमांक 67/2014 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 394 व 34 अन्वये दाखल झालेल्या या प्रकरणाचा सेशन केस क्रमांक 14/2020 असा होता. या खटल्यात अमोल चंद्रकांत गाढवे (वय 37, रा. बोफखेल-खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (वय 34, उत्तमनगर, वारजे-माळवाडी, पुणे) यांच्याविरोधात सरकार पक्षाने ठोस पुरावे आणि प्रभावी मांडणी केली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या उल्लेखनीय यशाबद्दल कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष शिंदे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे गुहागर पोलीस ठाण्याच्या तपासकौशल्याची, पुरावे संकलित करण्याच्या क्षमतेची आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधण्याच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस दलासह विविध स्तरांतून दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.










