गुहागरमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे नूतन केंद्रप्रमुखांचा सत्कार; आदर्श कामकाजाचे आवाहन
‘मिळालेल्या संधीचे सोने करा, गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन द्या’ – जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण यांचे मार्गदर्शन
गुहागर | प्रतिनिधी – सुजित सुर्वे
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा गुहागर यांच्या वतीने नूतन केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा शृंगारतळी येथे उत्साहात पार पडला. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून केंद्रप्रमुख पदावर विराजमान झालेल्या अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक अंकुश चांगण यांनी मार्गदर्शन करताना, “मिळालेल्या संधीचे सोने करत आदर्शवत प्रशासकीय कामकाज करावे. आरोग्याची काळजी घेत अनाठायी स्पर्धा टाळावी. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस क्षीरसागर, गुहागर तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, सरचिटणीस प्रभू हंबर्डे, राज्य व जिल्हा परिषद आदर्श पुरस्कारप्राप्त केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, केंद्रप्रमुख प्रभाकर कांबळे, प्रमोदिनी गायकवाड, वैभव पवार, मीनाक्षी पवार तसेच संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी जुनी पेन्शन मिळविण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. नूतन केंद्रप्रमुख भुते मॅडम यांनी “एकच मिशन… जुनी पेन्शन” हे गीत सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला तसेच जुनी पेन्शनचा जागर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभू हंबर्डे यांनी केले. सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.










