पाटपन्हाळे महाविद्यालयात महिलांच्या आर्थिक व आरोग्य सक्षमीकरणावर मार्गदर्शन; विद्यार्थिनींना स्वावलंबनाचा संदेश
महिला विकास कक्षाचा उपक्रम; डॉ. रोहिणी ओतारी यांचे आर्थिक साक्षरता, आरोग्य आणि उद्योजकतेवर सविस्तर मार्गदर्शन
पाटपन्हाळे | प्रतिनिधी (मंगेश जाधव) :
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्या वतीने “महिलांचे आर्थिक व आरोग्य सक्षमीकरण” या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आर्थिक साक्षरता, स्वावलंबन आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. ए. देसाई उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिपळूण येथील आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. डॉ. प्रा. सौ. रोहिणी दीपक ओतारी उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. ओतारी यांनी महिलांच्या आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, बचत, गुंतवणूक, विमा, आर्थिक नियोजन, उद्योजकतेच्या संधी तसेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यदृष्ट्या सुदृढ महिला ही कुटुंब व समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे देत दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक बाबींवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. ज्ञान, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला विकास कक्षातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. सौम्या चौघुले यांनी केले, तर प्रा. कांचन कदम यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थिनींचे आभार मानले.









