🏆 ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या जीवनदायी कार्याचा राज्यस्तरावर गौरव! 🩸
पुणे / मावळ: ९ऑगस्ट २०२६ प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड
रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान यांसारख्या अत्यंत मोलाच्या आणि जीवनदायी सामाजिक कार्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात प्रतिष्ठित ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित राज्य अधिवेशन २०२६ (वडगाव मावळ, पुणे) मध्ये हा सोहळा पार पडला. या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदाते जोडणी आणि गरजू रुग्णांना तातडीने रक्तघटक उपलब्ध करून देण्याच्या कार्याची विशेष दखल घेत हा बहुमान देण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान:
प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा संस्थापक सदस्य सचिन गुंड आणि दोडामार्ग-सावंतवाडी तालुका विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक व ग्राहक पंचायत वेंगुर्ला पदाधिकारी संजय पिळणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याचे उद्घाटक मा. न्यायमूर्ती सुरेन्द्र तावडे, मा. मंत्री सुधीर मुनगुंटीवार, आमदार मा. राजेंद्र पवार, मा. सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाषबापू देशमुख, मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके, मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्य पातळीवर मान:
या गौरवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि रक्तदान चळवळीला राज्यस्तरीय व्यासपीठावर मोठी मान्यता मिळाली आहे. हा सन्मान सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य, गोवा व कर्नाटक अशा विविध भागांत कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते, हितचिंतक, सल्लागार तसेच जिल्ह्यातील सर्व मित्रसंस्था आणि रक्तपेढ्यांचा आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘रक्तदान हेच जीवनदान’ या उदात्त हेतूने अविरत कार्य करणाऱ्या प्रतिष्ठानच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे! 🙏🇮🇳










