जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साटवली (मराठी) येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायती आणि देशभक्तीपर भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने
लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण
लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साटवली (मराठी) येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीपर आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर राष्ट्रध्वजाच्या रंगांनी व आकर्षक पुष्पालंकारांनी सजवण्यात आला होता.
सकाळी मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन तिरंग्याला सन्मानपूर्वक सलामी दिली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “स्वातंत्र्यदिन चिरायू होवो” अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
ध्वजारोहणानंतर शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांनी विविध शारीरिक कवायती व शिस्तबद्ध संचलन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर आयोजित कार्यक्रमात छोट्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने देशभक्तीपर भाषणे दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देणाऱ्या या चिमुकल्यांच्या भाषणांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
शाळेतील बालचमू निळ्या व पांढऱ्या गणवेशात, मस्तकावर गांधी टोपी परिधान करून शिस्तीत सहभागी झाली होती. लहानग्या विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि कवायतींमधील सहभाग पाहून उपस्थित पालकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मुख्य फलकावर सुंदर रंगांमध्ये “८० वा १५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो” असे आकर्षक फलकलेखन करण्यात आले होते. तसेच ‘राष्ट्रगीत’, ‘वंदे मातरम्’, ‘प्रतिज्ञा’ आणि ‘भारतीय संविधान उद्देशिका’ यांचे सुलेखन केलेले फलक झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते.
या सोहळ्याला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माता-पालक संघाचे प्रतिनिधी, माजी विद्यार्थी तसेच केंद्र प्रमुख व साटवली गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









