कमी पावसाने कोकणातील भात-नाचणी पिके करपली; शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
आमदार भास्कर जाधवांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
कोकणात यंदा झालेल्या अनियमित आणि अत्यल्प पावसाचा मोठा फटका भात आणि नाचणी पिकांना बसला आहे. पावसाअभावी अनेक भागांतील पिके करपण्याच्या स्थितीत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आगामी उन्हाळ्यात कोकणातील अनेक भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोकणासाठी तातडीने विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
खरीप हंगामावर पावसाअभावी संकट
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार जाधव यांनी कोकणातील शेतीची सद्यस्थिती मांडली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे भात लागवडीला सुरुवातीपासूनच विलंब झाला. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि नांगरणीसाठी मोठा खर्च केला. मात्र लागवडीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने भात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.
सध्या भाताची पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असतानाच पावसाअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने विलंब न करता नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती
शेतीच्या नुकसानीसोबतच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईकडेही आमदार जाधव यांनी लक्ष वेधले आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांनी कमी असल्याने भूजल पातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास याचा परिणाम शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीसाठ्याचे संवर्धन करण्याची मागणी
जलसंधारण, पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर संवर्धन आणि नियोजन करण्याची गरज आमदार जाधव यांनी व्यक्त केली आहे.
डोंगर उतारावरून थेट समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी तातडीने ठोस आराखडा तयार करावा. पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक मुरवणुकीसाठी उपाययोजना केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. यामुळे आगामी काळात शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
कोकणातील भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, पिकांचे पंचनामे, आर्थिक मदत आणि आगामी पाणीटंचाईचे नियोजन यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.












