📰 मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथे पादचारी ठार – धुक्यामुळे अपघात?
मुंबई–गोवा महामार्गावर हातखंबा येथील ईश्वर ढाबा परिसरात रविवारी पहाटे झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे ६ वाजता घडली.
मृत पादचारीचे नाव अंतराम्मु चौधरी (वय ५५, मूळ नेपाळ) असे आहे. चौधरी हे पहाटे हातखंबा ते निवळी मार्गे महामार्गावरून पायी जात होते. त्यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून मोठ्या जोरात धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी परिसरात घनदाट धुके असल्याने पादचारी वाहनचालकांना दिसला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी वाहनाचे काही पार्ट तुटून पडलेले आढळले असून, त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चौधरी यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अज्ञात वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.














