जनतेच्या पैशातून अहंकाराचे प्रदर्शन; पाटीवर नियमबाह्य सन्मान
ग्रामपंचायत पाटीवर नियम धाब्यावर; व्यक्तीपूजेचा कळस
रत्नागिरी :- निलेश रहाटे
सार्वजनिक निधीतून, विशेषतः जनसुविधा निधीतून उभारण्यात आलेल्या वाटद मिरवणे ग्रामपंचायत इमारतीवर नियमबाह्य पद्धतीने सरपंच व सदस्यांच्या नावांसमोर “साहेब” व “मॅडम” असा उल्लेख करून पाटी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहायला मिळत आहे.
जनतेच्या मूलभूत गरजांसाठी वापरायचा निधी थेट अहंकार प्रदर्शनासाठी वापरला गेला का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असताना, जनसुविधा निधीतून बांधलेल्या शासकीय इमारतीवर त्यांना अधिकारीसदृश सन्मान देणे म्हणजे नियमांचा उघड भंग असून, हा प्रकार व्यक्तीपूजेचे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र चर्चा नागरिकांत सुरू आहे.
शासनाच्या स्पष्ट सूचनांनुसार सार्वजनिक निधीतून — विशेषतः जनसुविधा निधीतून — बांधलेल्या इमारतींवर फक्त नाव व पदनाम लिहिणे बंधनकारक असताना, “साहेब–मॅडम” असा उल्लेख करून शासन परिपत्रकांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार कोणाच्या आदेशाने, कोणाच्या लेखी मंजुरीने आणि कोणाच्या संरक्षणाखाली करण्यात आला?
याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संशय व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांसाठी नियम आणि लोकसेवका साठी वेगळे नियम, अशी दुहेरी भूमिका प्रशासन घेत आहे का?
असा संतप्त सवाल सामाजिक RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे हयांनी उपस्थित केला आहे.
पाटी तात्काळ दुरुस्त करण्यात आली नाही, तर उच्चस्तरीय तक्रार, आंदोलन व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
लोकशाहीत इमारती जनतेच्या असतात जनसुविधा निधी हा विकासासाठी असतो, व्यक्तींच्या अहंकारासाठी नव्हे,
हे प्रशासनाला कधी कळणार?
असा रोखठोक सवाल आता सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचारत आहेत.














