केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’
मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज, सुविधा व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी
मुंबई : किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नव्या नावानंतरही KEM हे संक्षिप्त नाव कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या निर्णयाला केईएम मार्ड (MARD) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने जोरदार विरोध दर्शवला आहे.
मार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय ही देशातील प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि नामांकित संस्था आहे. अशा संस्थेच्या नावाबाबत निर्णय घेताना निवासी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. कोणतीही चर्चा न करता परस्पर नामांतराचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
केईएम रुग्णालयाने अनेक दशकांपासून सार्वजनिक आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संस्थेची वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.
नाव बदलून प्रश्न सुटत नाहीत : मार्ड
मार्डने प्रशासनाचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, रुग्णालयाचे नाव बदलून मूळ समस्या सुटणार नाहीत. निवासी डॉक्टरांना वसतिगृहात अपुऱ्या सुविधा, लिफ्ट वारंवार बंद पडणे, मानधन वेळेवर न मिळणे, कामाच्या ताणासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत नामांतरापेक्षा आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, डॉक्टरांच्या सुविधा वाढवणे आणि रुग्णालयातील प्रशासकीय प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मार्डने सांगितले.
प्रशासनाने पुनर्विचार करावा
केवळ नाव बदलण्याऐवजी रुग्णालयातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर ठोस निर्णय घ्यावेत. केईएमचे नाव न बदलता संस्थेच्या विकासावर भर द्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.















