दिवा–चिपळूण मेमू रेल्वेचा संगमेश्वरपर्यंत विस्तार करण्याचा कोकण रेल्वेला निवेदन
संगमेश्वर :- गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात स्पेशल ट्रेन म्हणून धावणाऱ्या दिवा चिपळूण मेमू गाडीचा विस्तार करून ती कायमस्वरूपी दिवा संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील एक सविस्तर निवेदन रेल्वे प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले आहे.
हा विस्तार झाल्यास केवळ संगमेश्वरच नव्हे,तर मार्गावरील इतर अनेक स्थानकांना आणि गावांतील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार,खालील परिसरातील प्रवाशांची सोय होईल.
कामथे,सावर्डे,आरवली कडवई आणि आसपासचा परिसर.चाकरमान्यांना गावी ये-जा करताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. आरक्षित तिकिटे न मिळाल्याने अनेकांना अत्यंत कसरतीने आणि त्रासाने प्रवास करावा लागतो.या भागातील असंख्य नागरिक रोजगार,शिक्षण,व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई व उपनगरां मध्ये नियमितपणे ये-जा करत असतात.
या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने, मेमू सेवा सुरू झाल्यास या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपने व्यक्त केला आहे. ही सेवा सुरू केल्यास सर्वसामान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल.
प्रवाशांच्या हिताचा आणि गरजेचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.
——













