फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे
21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर
रिपोर्टर-प्रशांत पवार
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील भ्रष्टाचार व निष्काळजीपणाच्या तक्रारींवरून वादात सापडलेल्या विभागाची साफसफाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपविली आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (दि. 19) यासंदर्भातील आदेश जारी केले. FDA आयुक्त श्रीधर डुबे यांची मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंडे यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे.
*दीड महिन्यात दुसरी बदली
तुकाराम मुंडे यांची दीड महिन्यात ही दुसरी बदली आहे. 31 मार्च रोजी त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली झाली होती. दिव्यांग कल्याण विभागात बोगस संस्थांवर कारवाईचा बडगा उगारल्याने संस्थाचालकांच्या दबावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती.
21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत मुंडे यांची ही 25 वी बदली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची साधारणपणे तीन वर्षांनी बदली होते, परंतु मुंडे क्वचितच एका विभागात वर्षभरापेक्षा जास्त काळ राहिले आहेत.
*FDA वादाच्या भोवऱ्यात*
गेल्या काही महिन्यांपासून FDA विभाग भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादात आहे. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (ACB) मंत्रालयातच लाच घेताना एका अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली होती. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही विधानसभा अधिवेशनात तक्रारी करूनही विभाग कारवाई करत नसल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर सचिव दर्जाचे अधिकारी असलेल्या मुंडे यांना आयुक्तपदी नेमणे ही एकप्रकारे पदावनती असली तरी, FDA मध्ये ‘सफाई’ करण्यासाठीच त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
*इतर प्रशासकीय बदल*
या बदलांसोबतच कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर राज्य कामगार विमा योजना आयुक्त आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.















