सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर
वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा 
मुंबई : देशांतर्गत पर्यटनाला मिळालेल्या मोठ्या चालनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत असून, या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मंत्री यांच्या दालनात पार पडली.
आदरणीय पंतप्रधान यांच्या ‘देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन’ या आवाहनानंतर राज्यातील विविध पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला असून, सिंधुदुर्ग जिल्हाही पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागला आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या पर्यटक संख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
यासोबतच पर्यटनस्थळांवरील स्वच्छता राखणे, पार्किंग व्यवस्थेची सुधारणा करणे, पर्यटकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटन अनुभव अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावर विशेष भर देण्यात आला. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आगामी पर्यटन हंगामासाठी तयारी पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयेामी साटम, जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकार आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
#SindhudurgTourism #NiteshRane #MaharashtraTourism #CMOMaharashtra #DevendraFadnavis
















