आरे भंडारवाडा शाळेत गुहागर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात; आनापान, शाळा व्यवस्थापन समिती व अध्ययन निष्पत्तीवर मार्गदर्शन

आरे भंडारवाडा शाळेत गुहागर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात; आनापान, शाळा व्यवस्थापन समिती व अध्ययन निष्पत्तीवर मार्गदर्शन

केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिषद; शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

गुहागर (सुजित सुर्वे) : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, आरे भंडारवाडा येथे गुहागर केंद्राच्या शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या शिक्षण परिषदेला माजी सभापती सुरेश दादा सावंत, अध्यक्ष ॲड. संजोग सावंत, सरपंच समीर घाणेकर, उपसरपंच भोसले मॅडम, पोलीस पाटील मिलिंद सुर्वे, प्रतिष्ठित नागरिक दीक्षा मोरे मॅडम, अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वासावे तसेच गुहागर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत ‘मित्र’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विपश्यना आनापान कार्यक्रमाविषयी मथुवेल गावित सर यांनी मार्गदर्शन केले. शाळेत दररोज दहा मिनिटे आनापान ध्यान घेतल्यास विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासातील गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.

यानंतर असगोली क्रमांक २ शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पुनर्गठन, समितीची कार्यपद्धती, रचना आणि महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.

आंधळे सर यांनी जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम याची माहिती दिली, तर धुमाळ सर यांनी शैक्षणिक समस्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेतला.

अन्नपूर्णा विद्यालयाचे संजय गमरे सर यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित शैक्षणिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी केंद्रातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

शिक्षण परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शिक्षकांनीही परिषदेतील मार्गदर्शनाचा लाभ घेत शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें