मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवात पाटपन्हाळे महाविद्यालयाची दमदार कामगिरी
कथाकथनात द्वितीय, भारतीय समूहगीत गायनात तृतीय क्रमांक; अंतिम फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर : मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६-२७ अंतर्गत उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत उत्तर रत्नागिरी झोनमधील एकूण २१ महाविद्यालयांनी विविध कलाप्रकारांमध्ये सहभाग नोंदविला.
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने या युवा महोत्सवात एकूण १० विविध कलाप्रकारांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.
कथाकथन स्पर्धा गट ‘अ’ मध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. नेत्रा प्रसाद पाध्ये हिने द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
तसेच भारतीय समूहगीत गायन स्पर्धेत महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. या संघात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. साक्षी पवार, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. मिताली शिगवण, प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील कु. सदिच्छा कदम, कु. आदिती देवळे, कु. रिया घाणेकर तसेच द्वितीय वर्ष कला शाखेतील कु. सुदीक्षा भागडे यांनी सहभाग घेतला.
स्कीट गट ‘क’ (हिंदी) या स्पर्धेतही महाविद्यालयाने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या स्कीटमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. समृद्धी घाणेकर, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. मिताली शिगवण, कु. श्वेता निंबरे, कु. साक्षी पारदळे तसेच प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील कु. विकेशा सकपाळ आणि कु. अनघा सुरळकर यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम तसेच रत्नागिरी येथील कोरिओग्राफर मा. श्री. अक्षय पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची तसेच सांस्कृतिक विभागाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन करून अंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामुळे पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.










