आबलोलीतील प्रमेय आर्यमाने यांची नि:स्वार्थ जनसेवा; पागडे कुटुंबीयांकडून जाहीर सत्कार
महावितरणची वीजवाहिनी मोफत स्थलांतरित करून घराचे काम मार्गी; जनसेवेची बाळू पागडे यांनी ठेवली आठवण
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि माजी सरपंच प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली नि:स्वार्थ जनसेवा एका जाहीर सत्काराच्या रूपाने फळाला आली आहे. आपल्या अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तीची आठवण ठेवत बाळू पागडे यांनी प्रमेय आर्यमाने यांचा नूतन वास्तूशांती कार्यक्रमात जाहीर सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली.
आबलोली गावातील पागडेवाडी येथील रहिवासी बाळू पागडे यांना नवीन घर बांधायचे होते. मात्र, घर बांधण्यात येणाऱ्या जागेवरून महावितरणची वीजवाहिनी गेली होती. त्यामुळे घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी ही वीजवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक होते.
या समस्येबाबत बाळू पागडे तसेच पागडेवाडीतील प्रमुख ग्रामस्थांनी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांची भेट घेऊन वीजवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. आर्यमाने यांनी संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या कामाचा पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीजवाहिनी स्थलांतराचे काम कोणताही खर्च न घेता पूर्ण करून दिले. त्यामुळे बाळू पागडे यांच्या घराच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आणि त्यांच्या नूतन वास्तूचे काम पूर्ण होण्यास मदत झाली.
या मदतीची आठवण ठेवत बाळू पागडे यांनी आपल्या नूतन वास्तूशांती कार्यक्रमात प्रमेय प्रदीप आर्यमाने यांना आवर्जून निमंत्रित करून त्यांचा जाहीर सत्कार केला. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या कामाची अशा प्रकारे दखल घेतल्याने प्रमेय आर्यमाने यांच्या नि:स्वार्थ जनसेवेला एकप्रकारे पोचपावती मिळाली.
प्रमेय आर्यमाने हे ‘नि:स्वार्थ जनसेवा’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप चालवतात. या माध्यमातून विविध नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. गरजू नागरिकांना शासकीय यंत्रणा तसेच विविध विभागांशी संपर्क साधून मदत मिळवून देण्याचे काम ते करत आहेत.
त्यांच्या या नि:स्वार्थ सामाजिक कार्याबद्दल आबलोली परिसरातून प्रमेय आर्यमाने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ‘जनसेवा हीच खरी समाजसेवा’ या भावनेतून सुरू असलेल्या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.










