खाऊच्या पैशातून विद्यार्थ्यांची ‘बचत बँक’; कोळवली भुवडवाडी शाळेचा अभिनव उपक्रम
शालेय जीवनातच बचतीची सवय लागावी, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे आणि भविष्यातील स्वप्नांसाठी विद्यार्थ्यांनी बचत करावी या उद्देशाने उपक्रमाची सुरुवात
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्रांतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवली भुवडवाडी ही अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील शाळा आहे. भविष्यातील काळाची गरज ओळखून या शाळेने विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजविण्यासाठी ‘विद्यार्थी बचत बँक’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचे कोळवली पंचक्रोशीतून कौतुक व स्वागत होत आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे, बँकेतील आर्थिक व्यवहारांची प्राथमिक माहिती मिळावी, तसेच दररोज मिळणाऱ्या खाऊच्या पैशांमधून काही रक्कम बचत करून भविष्यातील गरजा व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने शाळा व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाळेत करण्यात आली आहे.
‘आजची छोटी बचत, उद्याचे मोठे स्वप्न’ हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. विद्यार्थ्यांना नियमित बचतीची सवय लागण्याबरोबरच आर्थिक शिस्त, नियोजन आणि पैशांचे योग्य व्यवस्थापन यांचे प्राथमिक धडेही मिळणार आहेत.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षक सतीश विचारे आणि मुख्याध्यापक रविंद्र कुळये यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता व्यवहारज्ञान आणि आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत, यासाठी शाळेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या उपक्रमाचे गावचे सरपंच संतोष सावरकर, ग्रामसेवक सुनील कदम, उपसरपंच अजित भुवड, सत्यवान हुमणे, अभि लिंगायत तसेच पाणी कमिटी अध्यक्ष संदिप ठोंबरे यांनी कौतुक केले. शाळेच्या स्थापनेपासून प्रथमच अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल शिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेची पायाभरणी करणारा ‘विद्यार्थी बचत बँक’ उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.









