छान छान हसा, छान छान दिसा”; बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके दिसतात : डॉ. मधुसूदन घाणेकर

*“छान छान हसा, छान छान दिसा”; बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके दिसतात : डॉ. मधुसूदन घाणेकर*

 

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : “या बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके दिसतात. बालांनी छान छान हसावे, छान छान दिसावे,” असे प्रतिपादन ‘शिशू विश्व’ संस्थेतर्फे आयोजित पहिल्या शिशू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘शूर शिशू’ या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ. घाणेकर संपादित ‘डहाळी संमेलन विशेषांका’चे उपस्थित बालकांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

संमेलनाचे उद्घाटन गोपाळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा लोंढे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाला मधुकर्णिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, प्राचार्य सचिन वाल्मिकी आणि तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या बालसचिव एम. अजया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शीतल नागवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीति कनगरे यांनी प्रास्ताविक केले, तर अनुश्री घाणेकर यांनी आभार मानले.

 

संमेलनानिमित्त आयोजित काव्य सादरीकरण आणि ‘माझी शाळा’ निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसे देण्यात आली. काव्यस्पर्धेत आरोही मोडकर, धवलभाई चौधरी आणि साई लांजेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. श्रद्धा मदने आणि अवनिश केंजळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ‘माझी शाळा’ निबंध स्पर्धेत श्रद्धा मदने, अनन्या खंडागळे आणि यश ढावरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. विहान जगताप आणि यशवंत म्हेत्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मधुकर्णिका सासवडे, एम. अजया, प्राचार्य सचिन वाल्मिकी आणि मंजुषा लोंढे यांचीही भाषणे झाली.

 

समारोपप्रसंगी डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी ‘बे दुणे चकली’ या त्यांच्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाची झलक सादर करून बालांना मनमुराद हसवले. शिशू विश्व संस्थेतर्फे डॉ. मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय बालसाहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंजुषा लोंढे यांना आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार, तर मधुकर्णिका सासवडे, एम. अजया, शीतल नागवडे आणि अनुश्री घाणेकर यांना बालसाहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

या सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीला विद्वांस आणि ज्योतिर्विद परशुराम कुंभार उपस्थित होते. एम. अजया आणि दीपाराणी गोसावी यांच्या शुभहस्ते बालांना खाऊवाटप करण्यात आला. काव्य, निबंध, बालसाहित्य आणि एकपात्री सादरीकरणाने रंगलेले हे पहिले शिशू साहित्य संमेलन बालसाहित्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे ठरले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें