लांजातील बीट अंमलदारांचे माहिती फलक तत्काळ अद्ययावत करा; सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांची मागणी
बदली झालेल्या पोलिसांची नावे व मोबाईल क्रमांक हटवून कार्यरत बीट अंमलदारांची माहिती लावण्याची मागणी; नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे निवेदन
लांजा प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
लांजा : सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच तातडीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी लांजा पोलीस ठाणे आणि परिसरातील दूरक्षेत्रांमधील (Outpost) बीट अंमलदारांचे माहिती फलक तात्काळ अद्ययावत करण्यात यावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे लांजा तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लांजा पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांच्या माहितीसाठी ‘दूरक्षेत्र / बीट अंमलदार माहिती’ दर्शविणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या फलकावर नमूद असलेल्या अनेक बीट अंमलदारांची लांजा पोलीस ठाण्यातून इतरत्र बदली झालेली आहे. बदली झालेले अंमलदार सध्या लांजा येथे कार्यरत नसतानाही त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक अद्याप फलकावर कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे तातडीच्या प्रसंगी मदतीसाठी संबंधित क्रमांकावर संपर्क साधताना नागरिकांची दिशाभूल आणि गैरसोय होण्याची शक्यता आहे. नागरिकांना योग्य आणि अद्ययावत माहिती मिळणे आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
प्रमुख मागण्या
बदली झालेल्या बीट अंमलदारांची नावे आणि मोबाईल क्रमांक माहिती फलकावरून तत्काळ हटवावेत.
सध्या प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या बीट अंमलदारांची नावे व संपर्क क्रमांक फलकावर लावावेत.
नागरिकांना सहज वाचता येईल अशा ठळक आणि स्पष्ट अक्षरांमध्ये संपर्क क्रमांक नमूद करावेत.
सर्व पोलीस दूरक्षेत्र (Outpost) इमारतींवर संबंधित बीट अंमलदाराचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादी असलेले नवीन माहिती फलक लावावेत.
माहिती फलकावरील संपर्क क्रमांक आणि संबंधित अधिकाऱ्यांची माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या सोयीसाठी या मागणीवर पोलीस प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), लांजा उपविभाग यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.












