गुहागर तालुक्यात तरुणांसाठी एमआयडीसी आणणार; ५ ते ७ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य – सभापती प्रणव पोळेकर
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसीची मागणी; भातगाव-पंचक्रोशीसह पडवे-तवसाळ, पडवे-तांबट-बाबर, चिंद्रावळे परिसरातील जागांचा विचार
आबलोली (संदेश कदम) :
गुहागर तालुक्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भातगाव पंचक्रोशीसह पडवे-तवसाळ, पडवे-तांबट-बाबर किंवा चिंद्रावळे परिसरात एमआयडीसी उभारण्याच्या दृष्टीने जागांची पाहणी करण्यात आली असून, भविष्यात या माध्यमातून सुमारे पाच ते सात हजार रोजगार निर्माण होऊ शकतील, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी केले.
गुहागर तालुक्यातील भातगाव-गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या रेणुका आग्रे, विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर, अनंत डिंगणकर यांच्यासह गावकरी, मानकरी, जागामालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणांना स्थानिक रोजगार देण्याचे उद्दिष्ट
यावेळी बोलताना प्रणव पोळेकर म्हणाले की, गणपती विसर्जन तलावाच्या उभारणीत गावातील बुजुर्ग मंडळींचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले असून आज हा तलाव ग्रामस्थांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे.
पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाल्यापासून महिला आणि तरुणांसाठी आर्थिकदृष्ट्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील अनेक कुटुंबांतील नागरिक रोजगारासाठी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला स्थानिक पातळीवरच रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोळेकर यांनी स्पष्ट केले.
तीन ठिकाणच्या जागांची पाहणी
गुहागर तालुक्यात एमआयडीसी उभारण्याबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करण्यात आली असून, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पोळेकर यांनी सांगितले. एमआयडीसीसाठी तीन ठिकाणच्या जागा ओळखण्यात आल्या आहेत. मात्र, जागांची नावे जाहीर केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागांची नावे जाहीर केल्यास दलालांचा हस्तक्षेप वाढून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित फायदा मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाच ते सात हजार रोजगारांची अपेक्षा
भातगाव पंचक्रोशीसह पडवे-तवसाळ, पडवे-तांबट-बाबर किंवा चिंद्रावळे परिसरातील तरुणांना रोजगारासाठी मुंबईला जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियोजन सुरू आहे. या भागात एमआयडीसी आल्यास साधारणतः पाच ते सात हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून याबाबत लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केली.
गुहागर तालुक्याच्या विकासासाठी आखलेल्या या प्रयत्नांना लवकर यश मिळावे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले, तर अनंत गावडे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.












