कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअरच्या असंख्य संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

*कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअरच्या असंख्य संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – डॉ. प्रमोद सावंत

आबलोली (संदेश कदम)

कृषी शिक्षणातून केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता संशोधन, कृषी उद्योजकता, अन्नप्रक्रिया, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार ज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करावा, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कृषी विस्तार संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षातील कृषी व अन्नतंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. बाळासाहेब सावंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील होते. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रथम वर्षातील कृषी व अन्नतंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून कृषी क्षेत्रातील पारंपरिक संधींसोबतच आधुनिक काळात उदयास येत असलेल्या विविध करिअरच्या पर्यायांची सविस्तर माहिती दिली. कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर कृषी संशोधन, कृषी विस्तार, पीक उत्पादन तंत्रज्ञान, मृद व जलसंधारण, फलोत्पादन, पीक संरक्षण, बियाणे उत्पादन, कृषी निविष्ठा उद्योग, कृषी विपणन, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्रातील बदलती आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यावर भर न देता प्रत्यक्ष अनुभव, तांत्रिक कौशल्ये, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. कृषी क्षेत्रात संशोधन व नवोपक्रमांना मोठे महत्त्व असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमादरम्यानच विविध विषयांचा सखोल अभ्यास करून आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

अन्नतंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अन्नप्रक्रिया, अन्नसुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, अन्नपदार्थांचे मूल्यवर्धन, पॅकेजिंग, साठवणूक आणि कृषी आधारित उद्योगांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कृषी उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषी व्यवसाय अधिक सक्षम बनविणे यामध्ये तरुणांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कृषी क्षेत्रातील स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधींचा शोध घेण्याबरोबरच स्वतःचा कृषीपूरक व्यवसाय उभारण्याचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक शेती, कृषी सेवा केंद्रे, रोपवाटिका, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांत कौशल्य व नियोजनाच्या जोरावर यशस्वी वाटचाल करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा व्याख्यानांचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांची माहिती मिळाल्यास त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचाल आणि व्यावसायिक ध्येय निश्चित करण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन अभ्यास, प्रात्यक्षिके आणि कौशल्यविकास यांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कृषी व अन्नतंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा, उच्च शिक्षणाच्या संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व आणि उद्योजकतेच्या शक्यता यांविषयी उपयुक्त माहिती मिळाली. कृषी क्षेत्रातील बदलत्या संधींची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें