साटवलीत शेतरस्ता बंद केल्याने आंबा बागायतदार अडचणीत; शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप

साटवलीत शेतरस्ता बंद केल्याने आंबा बागायतदार अडचणीत; शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप!

 

जेसीबीने माती आणि दगड टाकून पारंपरिक शेतरस्ता अडवला; रस्ता तातडीने खुला करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लांजा (प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण)

लांजा तालुक्यातील मौजे साटवली येथे शेतकऱ्यांच्या हापूस आंबा बागेकडे जाणारा पारंपरिक मुख्य शेतरस्ता काही व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने माती आणि मोठे दगड टाकून बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. संबंधितांनी शेतरस्ता अडवून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

 

पारंपरिक शेतरस्त्याचा वापर ठप्प

 

साटवली मुख्य मार्गावरून रुण अपकरेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेला जोडणारा हा पारंपरिक पानंद रस्ता अनेक वर्षांपासून साटवली आणि रुण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या येण्या-जाण्यासाठी वापरात आहे. मात्र, मुख्य रस्त्याच्या फाट्यावरच माती आणि मोठे दगड टाकून अडथळा निर्माण करण्यात आल्याने बागांपर्यंत जाणे अशक्य झाले आहे.

 

पाणी, खते, औषध फवारणीचे साहित्य तसेच शेतीमालाची वाहतूक करणारी चारचाकी वाहने आणि अन्य वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे आंबा बागांची निगा राखणे आणि शेतीची दैनंदिन कामे करणे कठीण बनले आहे.

 

आंबा हंगामात रस्ता बंद करून पैशांची मागणी?

 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला की रस्ता बंद करणे, शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करणे आणि पैसे मिळाल्यानंतरच रस्ता खुला करणे, असा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. हंगाम संपल्यानंतर पुन्हा रस्ता अडवला जातो आणि पुढील हंगामात पैशांची मागणी केली जाते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

या प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असून आंबा बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकार चिंतेचा विषय बनला आहे.

 

जखमी कामगाराला रुग्णालयात नेण्यासाठी करावी लागली कसरत

 

रस्ता बंद करण्याचा प्रकार केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नसून मानवी सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच आंबा बागेत काम करत असताना एका कामगाराचा पाय ग्रास कटरमुळे गंभीर जखमी झाला होता. मात्र, रस्ता बंद असल्याने या जखमी कामगाराला मुख्य रस्त्यापर्यंत आणणे आणि पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहोचवणे अत्यंत जिकिरीचे ठरले.

 

सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास रस्ता बंद असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

शासन निर्णय आणि महसूल कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २२ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि वाहतुकीसाठी ३ ते ४ मीटर रुंदीचा शेतरस्ता उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 

तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ मधील कलम ५ अंतर्गत संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसांत आदेश देण्याच्या तरतुदीचीही प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

जिल्हाधिकारी ते पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार

 

शेतरस्ता अडवून शेतकऱ्यांची कथित आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बंद करण्यात आलेला पारंपरिक शेतरस्ता तातडीने खुला करून द्यावा, या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रांताधिकारी राजापूर विभाग, तहसीलदार लांजा आणि पोलीस निरीक्षक लांजा पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

आंबा हंगामाच्या महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन संबंधित तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करणार आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बागांपर्यंत जाण्यासाठी रस्ता कधी खुला करून देणार, याकडे संपूर्ण लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें