मासू ग्रामपंचायत इमारत बांधकाम ठप्प; वर्षभरानंतरही काम सुरू नाही – गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

मासू ग्रामपंचायत इमारत बांधकाम ठप्प; वर्षभरानंतरही काम सुरू नाही – गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

 

गुहागर (प्रतिनिधी) –

मासू ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम वर्षभर लोटूनही सुरू झालेले नाही. ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाबाबत झालेल्या विलंब, अनियमितता आणि निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आनंद भोजने यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

भोजने यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या बांधकामाबाबत एक वर्षापूर्वी गावात उपोषण पार पडले होते आणि ग्रामपंचायत इमारतीसाठीची जागा मोजणीही पूर्ण झाली होती. तरीदेखील इतक्या कालावधीनंतरही प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला नाही, हे अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, ग्रामपंचायत मासूची मुदत संपून लवकरच निवडणुकीची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतही बांधकामाविषयी कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

भोजने यांनी पुढे नमूद केले की, बांधकामासाठी आलेल्या निधीचा गैरवापर व भ्रष्ट आचरणाबाबत पूर्वीच लेखी तक्रार सादर केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी गावांना दिलेल्या भेटीदरम्यान निधी खर्च झाल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्ष काम अपूर्ण अवस्थेत आहे.

 

या सर्व बाबींची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांना पुन्हा उपोषण व आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही भोजने यांनी दिला आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]