आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

 

वसईतील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा संकल्प कुटुंबियांनी केला पूर्ण

नवीमुंबई (मंगेश जाधव): वसई येथील रहिवासी व वसई विकास बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी सौ. साधना मधुकर वर्तक (वय ६६ वर्षे) यांनी आयुष्यभर जपलेला मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी पूर्ण करत मानवतेचा अत्यंत प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. आभा परिवर्तनवादी संस्था (संकल्प अवयव दानाचा) यांच्या माध्यमातून हे पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले.

 

साधना वर्तक यांनी जिवंतपणी अवयवदानाचा ठाम संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेचा मान राखत पती मधुकर वर्तक, मुलगी किमया पाटील, जावई लिकिन पाटील आणि भाऊ उमेश पाटील यांनी या कठीण प्रसंगीही धैर्य दाखवत अवयवदानास संमती दिली.

 

कुटुंबियांनी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांच्या मार्फत संस्थेचे कार्यकर्ते सुमित वाडगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुमित वाडगावकर व वीणा सावंत यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. अवयवदानासंदर्भातील सर्व शंका, प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देऊन कुटुंबियांचे समाधान केले.

 

यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी उर्मिला मॅडम यांना देण्यात आली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी साधना वर्तक यांच्या दोन्ही किडनी, हृदय व यकृत यांचे अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले.

या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दु:खाच्या प्रसंगीही समाजहिताचा विचार करून घेतलेला हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी वर्तक कुटुंबियांचे विशेष आभार मानत, समाजात अवयवदानाबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. “अवयवदान म्हणजे जीवनदान” या उदात्त भावनेचा संदेश साधना वर्तक यांच्या कार्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]