ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

 

मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत जोरदार हल्ला चढवला आहे. “ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?” असा सवाल विचारत, ठाकरेंचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज, ज्यांचा महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि आमदारांना गुवाहाटीला नेण्यात मोठा हात होता, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. याच मुद्द्यावरून सुजात आंबेडकरांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे सत्तेत असताना ठाकरेंनी किती मराठी शाळा उघडल्या? किती मराठी कंत्राटदार किंवा उद्योजक घडवले? असा सवाल सुजात यांनी विचारला आहे. “यांच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणूस आज मुंबईबाहेर फेकला गेला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

ठाकरे कुटुंबाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले की,

बाळासाहेबांनी ज्यांच्या विरोधात ‘हटाव लुंगी’ची घोषणा दिली, त्याच दक्षिण भारतीय मतांसाठी आदित्य ठाकरे लुंगी घालून फिरत होते. जेव्हा गरज होती तेव्हा ‘केम छो वरली’ म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घातले.

आता जेव्हा पक्ष अडचणीत (व्हेंटिलेटरवर) आहे, तेव्हा यांना पुन्हा मराठी अस्मिता आठवू लागली आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले.

६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी सुद्धा मराठीच असतात. मात्र, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई सोडून बाहेर का जातात? तेव्हा तुमची मराठी अस्मिता कुठे जाते? असा बोचरा सवालही त्यांनी विचारला.

जेव्हा जेव्हा यांचा पक्ष संकटात असतो, तेव्हा हे लोक मराठी माणसाचा वापर करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान राहा, असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें