रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार दंड; राज्यभरात महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक पाठपुरावा

रत्नागिरी : राज्यात महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परतवाडा, नाशिक आणि यवतमाळ येथील प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच रत्नागिरीत एका आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथील सफीउल्ला समीर सोलकर (वय २४) या आरोपीने ओळखीच्या अल्पवयीन पीडितेला मारुती मंदिर परिसरात जबरदस्तीने अडवून तिच्याशी गैरवर्तन केले होते. पीडिता कामावर जात असताना आरोपीने तिचा हात धरून गाडीवर बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका अनोळखी व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पीडिता सुटली.

या घटनेनंतर पीडितेने तात्काळ आईला माहिती देत रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपीने यापूर्वीही ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेचा लैंगिक छळ केल्याचे उघड झाले. त्यानुसार भारतीय दंड संहिता व POCSO कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवर आणि युक्तिवादावर विश्वास ठेवत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. तसेच दंडातील ४० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील मेघना नलावडे यांनी काम पाहिले. एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता भोसले यांनी केला होता. कोर्ट पैरवीसाठी राहुल मोहिते तसेच सहाय्यक म्हणून अ‍ॅडव्होकेट प्रतिक्षा भानुशाली यांनी योगदान दिले.

महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्तरावर शिक्षा होत असल्याने समाजात सकारात्मक संदेश जात असून, अशा कठोर शिक्षेमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें