इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली वेगवान

नवी दिल्ली / मुंबई : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत आहे. गेल्या दहा दिवसांत तीन वेळा इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

केंद्र सरकारने नुकतेच डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये प्रति लिटरवरून शून्यावर आणले असून पेट्रोलवरील उत्पादन शुल्कदेखील ३ रुपयांपर्यंत कमी केले आहे. त्यानंतर आता राज्य सरकारांकडूनही करकपातीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराण युद्ध आणि त्याचे जागतिक परिणाम याचा अभ्यास करणाऱ्या सचिवांच्या विशेष गटाने महागड्या इंधनाचा फटका कमी करण्यासाठी व्हॅट कमी करण्याचा पर्याय चर्चेत आणला आहे. केंद्र सरकार लवकरच राज्यांना करकपातीबाबत सूचना करू शकते. विशेषतः भाजपशासित राज्ये या निर्णयात आघाडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिझेलवरील करकपातीवर अधिक भर दिला जात आहे. कारण मालवाहतूक, कृषी, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेल हा अत्यावश्यक घटक मानला जातो. डिझेलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम थेट बाजारातील सर्व वस्तूंच्या किमतींवर होतो. त्यामुळे व्हॅट कमी झाल्यास महागाईचा दबाव कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

मात्र, व्हॅटमध्ये कपात केल्यास राज्य सरकारांच्या महसुलावर परिणाम होणार आहे. वेतन, पेन्शन, व्याज भरणा आणि विविध कल्याणकारी योजनांवरील वाढता खर्च लक्षात घेता राज्य सरकारांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतो.

दरम्यान, २०२५ मध्ये राज्यांनी पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून तब्बल ३.०५ ट्रिलियन रुपयांचा महसूल मिळवला होता. यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला असून राज्य सरकारच्या तिजोरीत व्हॅटमधून ३६,९९२ कोटी रुपयांची भर पडली होती. महाराष्ट्रात सध्या इंधनावरील व्हॅट दर २१ टक्के आहे.

राज्य सरकारांकडून व्हॅट कपातीचा निर्णय झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें