लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; अण्णा भाऊंचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भायखळ्यातील नूतनीकृत अत्याधुनिक नाट्यगृहाचे उद्घाटन; चिरागनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक व संशोधन केंद्राच्या उभारणीलाही वेग
मुंबई | प्रतिनिधी
भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. हे नाट्यगृह त्यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन केंद्राच्या उभारणीचे काम सुरू असून, त्यासोबतच भायखळ्यातील नूतनीकृत नाट्यगृहाचे लोकार्पण हा सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. नाट्यगृहात आधुनिक रंगमंच, सुसज्ज ग्रीनरूम, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण करणारे आहे. त्यांच्या साहित्याचे २७ भाषांमध्ये अनुवाद झाले असून मराठी साहित्याचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृतीचे ऐतिहासिक कार्य केल्याचे सांगितले. राज्य शासनाकडून चिरागनगरसह सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथेही त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मारके उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक वातानुकूलित नाट्यगृह ७६१ आसनक्षमतेचे आहे. येथे ग्रीनरूम, मेकअप रूम, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्युत जनित्र, आधुनिक अग्निसुरक्षा सुविधा, पुस्तक विक्री दालन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासह विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
फोटो कॅप्शन :
भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.









