पालीतील लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी महिला ताब्यात
: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई; २ हजारांची रोकड, मोबाईल व इतर साहित्य जप्त

रत्नागिरी : पाली येथील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून रोकड, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’मध्ये महिलांना आणून ग्राहक उपलब्ध करून देत वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे आणि महिला कक्षातील अधिकारी व अंमलदारांनी पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने कारवाई केली.
छाप्यादरम्यान लॉजमधील एका खोलीत एक महिला आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत सदर महिलेकडून दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी घेतलेली २ हजार रुपयांची रोकड पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पाच सीलबंद निरोध पाकिटे, २ हजार रुपये रोख आणि सुमारे ५ हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाईल असा एकूण ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिला आर्थिक लाभासाठी बाहेरील शहरांतून महिलांना रत्नागिरी येथे आणून लॉजमध्ये ग्राहक उपलब्ध करून देत असल्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून संबंधित महिलांना ठराविक रक्कम देत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३ (२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात स.पो.नि. शबनम मुजावर, पोउनि. संदीप ओगले, म.स.पो.फौ. स्वाती राणे, म.पो.हवा. छाया चौधरी, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. गणेश सावंत आणि चालक पो.शि. अतुल कांबळे यांचा समावेश होता.
SEO Keywords: पाली लॉजवर छापा, रत्नागिरी पोलिसांची कारवाई, पाली रत्नागिरी बातमी, वेश्या व्यवसायप्रकरणी कारवाई, रत्नागिरी ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी क्राईम न्यूज










