महिला एकता संघाच्या दापोली तालुका अध्यक्षपदी सौ. कनिष्का स्वप्नील धुमाळ
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि निराधारांना आधार देण्यासाठी कार्यरत संस्थेची महत्त्वाची जबाबदारी
दापोली (प्रतिनिधी) : महिला एकता संघ, महाराष्ट्र राज्याच्या दापोली तालुका अध्यक्षपदी सौ. कनिष्का स्वप्नील धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांप्रति असलेली त्यांची बांधिलकी आणि सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. गीताताई पटेल आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. सोनल कांबळे यांनी दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांची नियुक्ती जाहीर केली.
महिला एकता संघ, महाराष्ट्र राज्य ही संस्था महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी कार्यरत आहे. तसेच निराधार महिला, अनाथ, दिव्यांग, मतिमंद, गतिमंद तसेच निराधार मुलांना आधार देण्याचे सामाजिक कार्य संस्थेमार्फत केले जाते.
महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला व मुलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
सौ. कनिष्का स्वप्नील धुमाळ यांच्यावर दापोली तालुक्यातील संस्थेच्या कार्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाच्या कार्याला दापोली तालुक्यात अधिक व्यापक स्वरूप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









