कोंडये गावातील वारंवार वीज खंडित; ग्रामस्थ त्रस्त, महावितरणला तीव्र आंदोलनाचा इशारा

कोंडये गावातील वारंवार वीज खंडित; ग्रामस्थ त्रस्त, महावितरणला तीव्र आंदोलनाचा इशारा

 

सलग चार-चार दिवस वीज-पाणी पुरवठा विस्कळीत; ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजनेची मागणी

 

लांजा (प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण)

 

लांजा तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोंडये येथे पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे ग्रामस्थ मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. अनेकदा सलग चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहण्यासोबतच पाण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये महावितरणविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

 

या गंभीर समस्येची दखल घेत कोंडये ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सखाराम चंदुरकर यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन गावातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

 

सरपंच चंदुरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, आजच्या काळात वीज ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. मात्र, महावितरणच्या दुर्लक्षामुळे कोंडये गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली असून, ग्रामस्थांना अनेक दिवस अंधारात राहावे लागत आहे.

 

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर समस्या सोडविण्यासाठी संबंधित वायरमन किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेक वेळा संबंधित कर्मचारी फोन उचलत नाहीत. फोन उचलला तरी नागरिकांना अरेरावीची किंवा समाधानकारक नसलेली उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. तसेच कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देऊन समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन, पावसाळ्यातील वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच मनोज चंदुरकर यांनी केली आहे.

 

दरम्यान, महावितरणने कोंडये गावातील वीजपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें