समावेशित शिक्षण (IED), समग्र शिक्षा, पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांचे वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप
गुहागर : समावेशित शिक्षण (IED), समग्र शिक्षा, पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर, जिल्हा परिषद रत्नागिरी व DIET रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी साहित्य वितरण कार्यक्रम पंचायत समिती सभागृह, गुहागर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास पंचायत समिती गुहागरचे सभापती मा. श्री. पोळेकर साहेब, उपसभापती मा. श्री. सुर्वे साहेब, पंचायत समितीचे सर्व सदस्य, गटविकास अधिकारी मा. श्री. शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. गळवे साहेब, विशेष शिक्षक, पालक व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक, सामाजिक, आरोग्यविषयक, बौद्धिक व मनोरंजनात्मक कौशल्यांना चालना देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहाय्यभूत साहित्याचा योग्य व नियमित वापर महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास, सहभागिता व कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने त्यांच्या गरजेनुसार साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत एकूण ४४ दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, सूक्ष्मकार किट, ब्रेन पॉईंट किट, एम.आर. किट आदी विविध प्रकारचे सहाय्यभूत साहित्य वितरित करण्यात आले.
या साहित्याच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होता यावे, त्यांच्या क्षमतांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधता यावा, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विशेष शिक्षक, पालक व संबंधितांनी सहकार्य केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.










