SIR प्रक्रियेत मोठा बदल; मतदारांच्या घरीच कागदपत्रे घेण्याचे निर्देश

highlight

SIR प्रक्रियेत मोठा बदल; मतदारांच्या घरीच कागदपत्रे घेण्याचे निर्देश

 

प्रतिनिधी : असलम शेख 

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. विशेषतः ‘Unmapped’ (जुळणी न झालेली) किंवा ‘Logical Discrepancies’ (तार्किक विसंगती) यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांना अनावश्यकपणे कार्यालयात किंवा सुनावणीसाठी बोलावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

पत्रानुसार, SIR प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना त्यांच्या नावाची जुन्या मतदार यादीशी जुळणी न झाल्यामुळे अथवा माहितीमध्ये तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी स्वतः जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करावीत. त्यानंतर संबंधित कागदपत्रे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (ERO) निर्णयासाठी ECINET पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अशा मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी ERO किंवा AERO यांच्या कार्यालयात बोलावण्याची आवश्यकता नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मतदार नोंदणी अधिकाऱ्याने प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यास संबंधित प्रक्रिया राबवता येईल.

 

तसेच आवश्यकता भासल्यास मतदाराच्या वतीने सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला परवानगी देता येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) यांच्या स्तरावर गरजू नागरिक, मजूर, गरीब आणि बेघर लोकांसाठी पुरेशा संख्येने मदत कक्ष सुरू करण्याची किंवा विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना करण्यात आली आहे.

 

यामुळे SIR प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे सादर करताना अडचणी येणाऱ्या नागरिकांना स्थानिक पातळीवर मदत मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेत BLO कडून घरभेटी घेऊन मतदारांची माहिती पडताळण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू आहे.

 

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील नोटीस टप्पा आणि दावे-हरकती निकाली काढण्याची मुदत १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

 

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे-हरकती आणि त्यावरील कार्यवाहीसाठी कमी कालावधी निश्चित करण्यात आला होता; त्यात आता बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील SIR कार्यक्रमासाठी यापूर्वीही वेळापत्रकात बदल करण्यात आले होते.

 

भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिद्ध पत्रकातील सूचनांनुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी सुधारित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

विशेष म्हणजे, २६ सप्टेंबरच्या आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर नोटीस प्रक्रियेत हा बदल करण्यात आला असून, BLO यांनी मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे घेण्याची आणि त्यानंतर ERO स्तरावर निर्णय घेण्याची पद्धत अधिक स्पष्ट करण्यात आली आहे.

 

SIR अंतर्गत ‘Unmapped’ किंवा ‘Logical Discrepancy’ची नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसून, संबंधित BLO शी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे. नोटीस मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला सरसकट कार्यालयात हजर राहणे बंधनकारक नसल्याचे या निर्देशातून स्पष्ट होते.

 

एकूणच, मतदारांना होणारा अनावश्यक त्रास कमी करण्यासाठी घरपोच कागदपत्र संकलन, ऑनलाइन प्रक्रिया आणि गरजूंसाठी विशेष मदत कक्ष यावर निवडणूक यंत्रणेने भर दिला आहे.

 

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून २८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रावर अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी (प्रशांत नानावे) यांची स्वाक्षरी आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें