दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहलीवर आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
पाण्याचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात ओढले गेल्याचा प्राथमिक अंदाज; महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य, उपचारादरम्यान मृत्यू
रायगड | प्रतिनिधी – मंगेश जाधव
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना घडली असून पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी आनंद घेत असताना अचानक ८ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.
घटनेची माहिती मिळताच महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. समुद्रकिनारी पर्यटकांनी पाण्याची खोली, लाटा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचा विचार करूनच समुद्रात उतरावे, तसेच सुरक्षेची पूर्ण खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.












