कांबळेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे निवेदन
नागेश्वर एकता मंडळाच्या वतीने सदिच्छा भेट; रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
गुहागर : दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी नागेश्वर एकता मंडळ, कांबळेवाडी (मुंबई) यांच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भास्करशेठ जाधव यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी दोडवली-कांबळेवाडी येथील रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देत याबाबतचे निवेदन साद करण्यात आले.
कांबळेवाडी येथील संबंधित रस्ता अत्यंत नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी, आजारी व्यक्ती, ग्रामस्थ तसेच दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भास्करशेठ जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले.
श्री. संतोष रामगडे व श्री. सिद्धी रामगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कांबळेवाडी विकासाच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे पाठपुरावा करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.
आमदार भास्करशेठ जाधव यांनी संबंधित विषय ऐकून घेत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
कांबळेवाडीच्या विकासासाठी तसेच ग्रामस्थांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नागेश्वर एकता मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या प्रसंगी नागेश्वर एकता मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक कांबळे, उपाध्यक्ष श्री. विठ्ठल पंडये, सचिन शं. कांबळे, नितिन कांबळे, रवींद्र दा. कांबळे (गावठाण), संदीप पंडये, संतोष अवेरे आणि विजय कांबळे उपस्थित होते.












