मुलांच्या भविष्यासाठी पालकांची जिद्द; कुबडीच्या आधाराने पालकांची रत्नागिरीत धाव राजापूर-साटवली एसटी व संस्थेची विद्यार्थी वाहतूक बंद; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी, तातडी

highlits

मुलांच्या भविष्यासाठी पालकांची जिद्द; कुबडीच्या आधाराने पालकांची रत्नागिरीत धाव

राजापूर-साटवली एसटी व संस्थेची विद्यार्थी वाहतूक बंद; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी, तातडीने तोडगा न निघाल्यास शाळा सोडण्याचा पालकांचा इशारा

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण

साटवली (ता. लांजा) येथील रा. सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजापूर-साटवली एसटी बसफेरी तसेच संस्थेच्या नावे असलेली विद्यार्थी वाहतूक गाडी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज सुमारे ७ ते ८ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रश्नाकडे संस्था व शाळा प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याने संतप्त पालकांनी ६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी गाठून विविध शासकीय कार्यालयांत निवेदने सादर केली.

 

शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक व विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा पालकांचा दावा आहे. मात्र, राजापूर-साटवली एसटी फेरी बंद झाल्यानंतर आणि संस्थेच्या नावे असलेली विद्यार्थी वाहतूक गाडी क्रमांक MH 08 AP 4539 बंद पडल्यानंतरही विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

 

यासंदर्भात पालकांनी साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव आदेश आंबोळकर यांची भेट घेऊन अनेकदा विनंती केली. मात्र, केवळ तोंडी आश्वासने मिळाली असून प्रत्यक्ष वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या वाहतूक व सुरक्षेची जबाबदारी संस्था संचालक मंडळाची, विशेषतः संस्था सचिवांची असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे संस्था व शाळा प्रशासनाने एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दिव्यांग पालकाची कुबडीच्या आधाराने रत्नागिरीत धाव

मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पालकांनी स्वतः पुढाकार घेतला. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले योगेश पाजवे हे पायाने दिव्यांग असूनही मुलांच्या भवितव्याचा विचार करून कुबडीच्या आधाराने रत्नागिरीतील विविध शासकीय कार्यालयांत पोहोचले. त्यांच्यासोबत विद्यार्थी पालक संतोष रजपूत हे देखील उपस्थित होते.

 

शारीरिक अडचणी असूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या चढत निवेदने देणाऱ्या पालकांची धडपड लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवून त्यांना सुरक्षितपणे शाळेत जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

पालकांच्या प्रमुख मागण्या

 

१. पर्यायी वाहतूक व्यवस्था: राजापूर-साटवली एसटी बसफेरी पूर्ववत सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी संस्थेने तातडीने सुरक्षित पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी.

 

२. एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी: शाळा प्रशासनाने राजापूर व लांजा आगाराशी समन्वय साधून राजापूर-साटवली बसफेरी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

 

३. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे: वाहतुकीअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संस्था व शाळा प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा.

 

तोडगा न निघाल्यास शाळा सोडण्याचा इशारा

 

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर नाईलाजास्तव आपल्या पाल्यांचे शाळा सोडल्याचे दाखले (एलसी) घेऊन त्यांना अन्य शाळेत दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशारा पालकांनी दिला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्था सचिव, संचालक मंडळ व शाळा प्रशासनाची राहील, असेही पालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे निवेदने

 

६ ऑक्टोबर रोजी पालकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदने सादर केली. संबंधित कार्यालयांकडून निवेदनांच्या प्रतींवर पोच व शिक्के घेण्यात आले आहेत. काही उर्वरित संबंधित विभागांकडेही निवेदने सादर करण्यात येणार असल्याचे पालकांनी सांगितले.

 

मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी घेतलेली ही भूमिका आता निर्णायक ठरणार का, तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी संस्था व शाळा प्रशासन तातडीने पावले उचलणार का, याकडे साटवली पंचक्रोशीतील पालकांचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें