शिक्षकांनी उपक्रमशीलतेतून शिक्षणाची गुणवत्ता जपावी!
माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन; राज्यातील ७५ उपक्रमशील आदर्श शिक्षकांचा सन्मान
मुंबई – संदीप शेमणकर
शिक्षकांनी पारंपरिक अध्यापन पद्धतीसोबतच विविध नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील प्रयोग राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची उपक्रमशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री. गोविंद नांदेडे यांनी केले.
कल्याणम् एज्यूकेअर, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथील सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील ७५ उपक्रमशील आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातून सौ. शितल हर्षल संखे (जिल्हा परिषद शाळा, शिगाव, ता. व जि. पालघर) यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई महानगरपालिका उपमहापौर श्री. संजय घाडी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षण संचालक श्री. गोविंद नांदेडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीमती निर्मलाताई सावळे उपस्थित होत्या. तसेच शिक्षणप्रेमी महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर श्री. साहेबराव सुरवसे, ज्येष्ठ शिक्षक श्री. शिवाजीराव कांडेकर सर आणि सिनेअभिनेत्री दिव्यांशी डे यांची विशेष उपस्थिती लाभली.
मुंबई महानगरपालिका उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थीकेंद्री शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. कल्याण नेहरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. सुभाषराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संपत मुरकुटे, श्री. कृष्णा सवदे सर, श्री. बंडू आघाव सर आणि श्री. भगवान नेहरकर यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले.
या पुरस्कार सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, ‘उपक्रमशील शिक्षक—गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला.











