वाकी नदीवर लोकवर्गणीतून दोन बंधारे; नवयुग मित्र मंडळ व जागृती महिला मंडळाचा पुढाकार

वाकी नदीवर लोकवर्गणीतून दोन बंधारे; नवयुग मित्र मंडळ व जागृती महिला मंडळाचा पुढाकार

जलसंधारणासाठी ग्रामस्थांचे हातभार; पालपेणे ते पिंपळवट नदीतील गाळ उपशाची मागणी

आबलोली (संदेश कदम) :

उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गुहागर तालुक्यातील वाकी येथे नवयुग मित्र मंडळ आणि जागृती महिला मंडळ वाकी पूर्ववाडी यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही मंडळांच्या वार्षिक लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने वाकी नदीवर दोन मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे नदीपात्रात पाणीसाठा निर्माण झाला असून, लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 

नदीपात्रातील तसेच नदीकाठावरील अनावश्यक झाडी दूर करून हे बंधारे उभारण्यात आले. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन मंडळांनी हा उपक्रम राबविला. शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवर्गणीतून करण्यात आलेला हा प्रयत्न परिसरातील अन्य गावांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.

 

दरम्यान, बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांनी, तेथे पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन वाकी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बारमाही वाहणाऱ्या नदीचा जलसाठा घटला

पालपेणे गावातून वाहत येणारी नदी वाकी, पिंपळवट आणि आरे या गावांच्या परिसरातून पुढे समुद्राला मिळते. सुमारे १० ते १५ वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी नदी म्हणून वाकी नदीची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नदीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतच नदीपात्र कोरडे पडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पुराच्या पाण्यामुळे तसेच पालपेणे गावातून गेलेल्या गॅस वाहिनीच्या कामादरम्यान बाहेर पडलेला चिखल नदीपात्रात साचल्याने गाळाचे प्रमाण वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीच्या तळाशी गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी दीर्घकाळ टिकून राहत नाही. परिणामी, उन्हाळ्यात नदीतील पाणीसाठा कमी होऊन परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

नदीच्या पुनरुज्जीवनासाठी गाळ उपशाची गरज

वाकी नदीचा जलसाठा पूर्ववत करण्यासाठी पालपेणे ते पिंपळवट या नदीपट्ट्यातील गाळ उपसा करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी बंधारे उभारणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नदीपात्राचे योग्य सर्वेक्षण करून पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामे केल्यास पालपेणे, वाकी, पिंपळवट आणि आरे या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते.

 

काही वर्षांपूर्वी नाम फाउंडेशनच्या वतीने नदीची पाहणी करून कामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, निधीअभावी पुढील काम मार्गी लागू शकले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या प्रस्तावित कामाला पुन्हा गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात

गुहागर तालुक्यातील नदी-नाल्यांमधील गाळ उपसा, पावसाचे पाणी अडविण्यासाठी योग्य ठिकाणी बंधारे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यासाठी शासनाने व्यापक योजना राबवावी, अशी मागणी होत आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी पाणीसाठा वाढविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन केल्यास शेती, भूजल पुनर्भरण आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागू शकतो.

 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थ, महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. वाकी येथील दोन्ही मंडळांनी लोकवर्गणीतून उभारलेले बंधारे हे त्याचे उदाहरण ठरले असून, शासनानेही या उपक्रमांची दखल घेऊन नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें