५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ
कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूलच्या लेझिम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
मानखुर्द, मुंबई : शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग, एम-पूर्व विभाग आणि सहशालेय उपक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ याचे उद्घाटन नूतन विद्यामंदिर, मानखुर्द-८८ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सना खान, बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक श्री. मुश्ताक शेख सर तसेच विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच सर्व मान्यवरांचे आदरातिथ्य सन्मान चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जाई जोशी बाई यांनी केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूलच्या लेझिम पथकाचे बहारदार सादरीकरण! सौ. वंदना ढवळे बाई यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली. पथकाच्या शिस्तबद्ध, तालबद्ध आणि उत्साहपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाच्या वातावरणात विशेष रंगत निर्माण झाली.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन संकल्पना, वैज्ञानिक प्रयोग, संशोधन आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प जवळून पाहण्याची ही एक उत्तम संधी आहे.
त्यामुळे परिसरातील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विज्ञानाची आवड, संशोधनाची जिज्ञासा आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.











