*भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करा: जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांचे आवाहन.
आबलोली (संदेश कदम)
राज्यात या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वत्र भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच काही भागात प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवर पाण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या पुढाकाराने आज मुंढर गावातील चाळकेवाडी येथील भोरशेत नदीवर एक वनराई बंधारा बांधण्यात आला.
विशेष म्हणजे, केवळ भाषण किंवा सल्ला न देता, स्वतः जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी हे प्रत्यक्ष पाण्यात उतरून ग्रामस्थांसोबत गोण्या रचताना आणि श्रमदान करताना पाहायला मिळाले. एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे प्रत्यक्ष कामात उतरलेले पाहून गावातील तरुण आणि महिलांचाही उत्साह द्विगुणित झाला.
भविष्यातील पाणीटंचाई कमी करायची असल्यास, आत्तापासूनच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि ते अत्यंत जपून वापरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे आवाहन यावेळी प्रमोद गांधी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
या मोहिमेत प्रमोद गांधी यांच्यासोबत मुंढर ग्रामपंचायतीचे अधिकारी सुरेश गोरे यांच्यासह चाळकेवाडी आणि मुंढर गावातील असंख्य महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून अत्यंत कमी वेळेत हा वनराई बंधारा पूर्ण केला.











