- 🚆
कोकण रेल्वे टीसीच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या बालकाचा जीव वाचला!
दादर–सावंतवाडी ट्रेनमध्ये घडली घटना; टीसी संदेश चव्हाण यांचे कौतुक, १५ हजारांचे बक्षीस जाहीर
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या एका सतर्क टीसीमुळे अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या बालकाला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. दादर ते सावंतवाडी या गाडीमध्ये २७ सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रसंगाने प्रवाशांच्या सुरक्षेतील कोकण रेल्वेच्या दक्षतेचा प्रत्यय आला.
गाडीत गस्त घालत असताना टीसी संदेश चव्हाण यांना एका इसमाबरोबर असलेले लहान मूल संशयास्पद वाटले. चौकशीदरम्यान त्या इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चव्हाण यांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्ष आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. धाडस दाखवत त्यांनी चालत्या ट्रेनमध्येच इसमाला आवर घातला.
पोलिसांच्या ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख अमोल अनंत उदलकर (४२, रा. इंदील, देवगड) अशी झाली. चौकशीत त्याने मुंबईतील केईएम रुग्णालयातून मूल पळवून आणल्याची कबुली दिली. सदर बालकाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय २) असे असून त्याची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपीने मुलाचे अपहरण केले होते.
या धाडसी कृतीसाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी संदेश चव्हाण यांचे विशेष कौतुक केले असून १५,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे एका बालकाचा जीव वाचल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
—
🔖 हॅशटॅग :
#KonkanRailway #RatnagiriNews #ChildRescue #IndianRailways #SafetyFirst #संदेशचव्हाण














