श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न
तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता
| तवसाळ, गुहागर
गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव ३ ते ७ मे २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. तवसाळ गाव पंचक्रोशीतील बाबरवाडी, तांबडवाडी विकास मंडळ मुंबई तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती.

चार दिवस चाललेल्या या महोत्सवात गण, गवळण, वगनाट्य आणि सामाजिक संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये “गावठी शोले”, “संघर्ष जीवनाचा”, “महिमा साईचा” तसेच सत्य घटनेवर आधारित “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या विनोदी फार्सला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बाल कलाकारांनी सादर केलेल्या गवळण पेंद्या सुदामा वाकड्या तसेच छोट्या मावशीच्या अभिनयाने उपस्थितांची मनं जिंकली. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणावर प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. पावसाचे वातावरण असतानाही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमांना दाद दिली.
या सर्व कार्यक्रमांचे चित्रिकरण Dj Sachin Kulaye YouTube Channel वर उपलब्ध करण्यात आले असून, कार्यक्रम पाहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तवसाळ पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री महामाई सोनसाखळी देवीची पालखी शिमगोत्सवानिमित्त मंदिरातून प्रस्थान करून तब्बल दीड महिना विविध ठिकाणी भक्तांना दर्शन देत विराजमान असते. सलग १८ दिवस गावभेट दौरा पूर्ण करून १९व्या दिवशी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देवीची पालखी भक्तांच्या भेटीसाठी विविध वाड्यांमध्ये नेण्यात आली.
तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, मोहितेवाडी, आगर, तांबडवाडी आणि बाबरवाडी परिसरात मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम साजरे करण्यात आले. महोत्सवाच्या अखेरीस ग्रामदैवताला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक मंदिराकडे प्रस्थान करत पालखी मंदिरात विसावली.
















